आभाळमाया - युवर्स, माईन अँड... युवर्स, माईन अँड आवर्स मधील हा "आवर्स'च लाख मोलाचा असतो! "तुझे' - "माझे' मिळून
"आपले' असे एकत्र मानायला मन तयार नसेल, तर ते घर हे नुसते चार भिंती व वर छप्पर
आहे, म्हणून असलेले घर ठरेल. आज प्रत्येक घरातून चार हात कमावते असणे ही काळाची
गरजच बनली आहे. पण या चार हातांचा मिळून एकच न्यूक्लिअस बनला, तर मायेचा ओलावा
टिकून राहील. नाही तर लक्ष्मीबरोबरच कलह-तंटाही गृहप्रवेश करतील!
हे सर्व जाणवायचे कारण म्हणजे काल आलेले जोडपे! अंजली-राहुलचा प्रेमविवाह...
दोघेही इंजिनिअर... राहुलने वडिलांच्या फॅक्टरीत काम करणे सुरू केले. अंजली मात्र
एका सॉफ्टवेअर कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून रुजू झाली. अंजलीचे उशिरा येणे,
दमलेली असल्याने कशातच रस न घेणे... राहुल त्रासू लागला... एकीकडे धंद्यात रिसेशन
आलेले... त्यामुळे राहुलची मिळकतही कमी होऊ लागली. याउलट अंजलीला मात्र चांगले
पॅकेज मिळाले होते. राहुलला आर्थिक मदत करून फॅक्टरीचे गाडे सुरळीत चालू करणे
आवश्यक होते. पण झाले भलतेच.... अंजली पगार शिल्लक टाकत असे. राहुल घरातील
जबाबदार पुरुष, त्यानेच संसाराचा गाडा ओढला पाहिजे, असा तिचा हेका. पैशाची गुर्मी
तिला स्वस्थ बसू देईना. शिवाय नोकरीतील मोठ्या हुद्यामुळे तिच्या मअहंफला खतपाणी
मिळाले. राहुलला ती घालून-पाडून बोलू लागली. कष्टाळू राहुलने श्रमाच्या जोरावर
फॅक्टरी सावरली. सुबत्ता आली. पण आता राहुलही पैसे वेगळे साठवू लागला. घराला
लक्ष्मीचे वरदान लाभूनही केवळ "तुझे पैसे, माझे पैसे' या वृत्तीमुळे शांतता नाहीशी
झाली. या पायी त्यांनी अजून मूलही होऊ दिलेले नाही. जरा भांडण झाले की घटस्फोटाची
भाषा सुरू...
त्याउलट गोष्ट अशोक-सुनीताची. दोघे बेतात शिकलेले. त्यामुळे नोकरीही बेताची...
घरात अशोकचे वृद्ध वडील. तेही जवळच्या दुकानात पार्ट-टाइम नोकरी करतात. सुनीता
नोकरीला जाते, तेव्हा छोट्या सागरला प्रेमाने सांभाळतात. तिघेही आपला पगार एकत्र
जमा करतात. त्यातून घरखर्च चालविला जातो व अंथरूण पाहून थोडी चैनही होते. सर्वांत
महत्त्वाचे, सर्व जण एकमेकांना बांधून राहिले आहेत. या "आवर्स'च्या पायावर त्यांचे
सुखी कुटुंब भक्कमपणे उभे आहे. भलेही तिथे लक्ष्मी पोटापुरती आहे, पण आस्था मात्र
आभाळाएवढी आहे...!
खरे म्हणजे यशस्वी विवाह म्हणजे असे सहजीवन आहे की एकाला ठेच लागली तर दुसऱ्याच्या
तोंडी "आई गऽऽ' येते. एकाच्या चेहऱ्यावर काळजीची रेष उमटली तर दुसऱ्याच्या पोटात
तुटते. यातील सुख, आनंद वेगळाच आहे... शेवटी र्ङीेंश ळी ाशर्रीीीश ेष लरीश! मग
आर्थिक बाबतीत वाद घालून "तुझे-माझे' करून आपण या आत्मिक आनंदास पारखे होतो...
- डॉ. नीलिमा घैसास |