|
|  |
 | | पंचांग | | ज्ञानवंत - योहान्स फायबिगर (डॅनिश चिकित्साशास्त्रज्ञ) योहान्स फायबिगर यांचा जन्म २३ एप्रिल १८६७ रोजी सिल्कबॉर्ब येथे झाला. कर्करोगावर
फायबिगर यांनी विशेष अभ्यास केला. उंदरांवर प्रयोग करून फायबिगर यांनी विविध
रोगांविषयी ज्ञान मिळविले. सन १९२६ मध्ये त्यांना डळिीेिींशीर उरीलळपोर या
शोधाबद्दल वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. बर्लिन येथे प्रसिद्ध
शास्त्रज्ञ खॉख यांच्या हाताखाली फायबिगर यांचे शिक्षण झाले. कोपनहेगन येथे काही
दिवस फायबिगर यांनी वैद्यकशास्त्राच्या अध्यापनाचे काम केले व त्यानंतर
इन्स्टिट्यूट ऑफ पॅथॉलॉजिकल अनॅटमी या संस्थेत प्रथम प्राध्यापक म्हणून व नंतर
प्रमुख म्हणून काम केले. ३० जानेवारी १९२८ रोजी योहान्स फायबिगर यांचे निधन झाले. |
दिनमान मेष - महत्त्वाची कामे करून घ्यावीत. नोकरीतील व्यक्तींना स्वास्थ्य लाभेल.
सार्वजनिक क्षेत्रात प्रगती.
वृषभ - भाग्यकारक घटना घडेल. सुसंधी व प्रसिद्धी लाभेल. अनेकांचे सहकार्य लाभेल.
मिथुन - उधारी वसूल होईल. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
कर्क - दैनंदिन कामे यशस्वी. महत्त्वाची कामे उरकून घ्यावीत. महत्त्वाचे व्यवहार
यशस्वी होतील.
सिंह - मनाची अस्वस्थता राहील. हितशत्रूंवर मात कराल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य
लाभेल.
कन्या - महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल. सुसंवाद साधाल. नवे हितसंबंध निर्माण करू
शकाल.
तूळ - मानसिक स्वास्थ्य लाभेल. गुंतवणुकीची कामे पूर्ण करू शकाल. महत्त्वाच्या
कामात सुयश.
वृश्चिक - आरोग्याकडे लक्ष द्या. महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल. अस्वस्थता
कमी होईल.
धनू - प्रवास शक्यतो टाळावेत. खर्च वाढणार आहेत. सहकार्याची अपेक्षा करू नये.
मकर - वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मनोबल वाढेल. हितशत्रूंवर मात कराल.
कुंभ - महत्त्वाची कामे शक्यतो टाळावीत. कर्मचारी वर्गाचे सहकार्य. खर्च वाढणार
आहेत.
मीन - प्रियजनांचा सहवास लाभेल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. अनेकांशी सुसंवाद
साधाल.
- प्रा. रमणलाल शहा |
५ जुलै - जागतिक सहकार दिन (जुलै महिन्याचा पहिला शनिवार) १९८२ - महान गीतकार भरत व्यास यांचे निधन.
१९९४ - मल्याळीतील ज्येष्ठ लेखक व स्वातंत्र्यसेनानी वैक्कोम मुहंमद बशीर यांचे
निधन.
१९९६ - संरक्षणमंत्र्यांचे वैज्ञानिक सल्लागार डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम व अवकाश
आयोगाचे सदस्य एन. पंत यांना प्रतिष्ठेचा "आर्यभट्ट पुरस्कार' जाहीर.
१९९६ - क्लोनिंग तंत्राद्वारे डॉली या मेंढीचा जन्म.
२००३ - इंग्रजी भाषेचे ज्येष्ठ तज्ज्ञ डॉ. रा. सो. सराफ यांचे निधन. |
गीत ज्ञानेश्वर स्वगृही जा याच क्षणाला ।
रुख्मिणीनं व्यथित अंतःकरणानं कथन केलेली ही कथा ऐकून महासिद्ध श्रीपादस्वामीही
व्यथित झाले. आपण ज्याला संन्यासदीक्षा दिली, तो रुख्मिणीचा पती विठ्ठलच आहे, याची
खात्री झाली.
आपली तीर्थयात्रा अर्धवट सोडून श्रीपादस्वामी, सिद्धोपंत आणि रुख्मिणीला
आपल्याबरोबर घेऊन काशीक्षेत्री आले...
विठ्ठल ऊर्फ चैतन्यस्वामी याला बोलावून त्याला खडसावू लागले...
आज्ञा करितो इथेच तुजला ।
स्वगृही जा, याच क्षणाला ।।धृ।।
आश्रमात येऊनी ।
कथा असत्य सांगुनी ।
काय मिळे जीवनी ।
फसविलेस तू मला ।।१।।
पुण्यक्षेत्री तू आला ।
त्यागिलेस पत्नीला ।
असूनी सर्व साथीला ।
असत्य मात्र बोलिला ।।२।।
पाश नाही काही मला ।
कथिलेस तूच मला ।
विश्वासून कथनाला
दीक्षा दिली मी तुजला ।।३।।
दर्शनास भार्या येता ।
सर्व कथा कानी येता ।
दुःख तिचे ज्ञात होता ।
पश्चात्ताप होई मला ।।४।।
दीक्षा दिली मीच तुला ।
अमान्य करी आजला ।
आज्ञा करी मीच तुला ।
स्वगृही जा याच क्षणाला ।।५।।
- रमाकांत देशपांडे |
योगदान - स्वामी त्रिगुणातीतानंद स्वामी त्रिगुणातीतानंद यांचं संन्यासपूर्व नाव सारदाप्रसन्न मित्र. जन्म ३०
जानेवारी १८६५ आणि वडिलांचं नाव शिवकृष्ण मित्र. ते श्रीमंत जमीनदार होते.
चौदाव्या वर्षाच्या आतच त्यांना १०८ स्तोत्रं, अनेक प्रणाममंत्र पाठ होते. त्यांची
श्रीरामकृष्णांशी भेट झाली. वराहनगरच्या मठात ते गुरुबंधूंना येऊन मिळाले.
संन्यासही स्वीकारला. १८९५ मध्ये तिबेट, मानस सरोवरालाही जाऊन आले. "उद्बोधन' या
बंगाली मासिकाची सुरवात स्वामी विवेकानंदांच्या सांगण्यावरून त्यांनी केली.
१९०३ च्या सुमारास ते वेदान्ताचा प्रचार करण्यासाठी अमेरिकेला गेले. लॉस एंजेलिस,
सॅन फ्रॅन्सिस्को इथं त्यांनी काम वाढवायला सुरवात केली. पाश्चात्त्य जगातलं
पहिलं हिंदू मंदिर सॅनफ्रॅन्सिस्को इथं त्यांनीच उभं केलं.
आयुष्याच्या शेवटच्या पाच वर्षांत त्यांना सांधेदुखीचा त्रास झाला. २८ डिसेंबर
१९१४ रोजी ते व्यासपीठावर व्याख्यान देत असताना एका माथेफिरूनं बॉंब टाकला.
कानठळ्या बसवणारा आवाज, धुराचे लोट यांनी व्यासपीठ लपेटलं गेलं. स्वामी
त्रिगुणातीतानंद यात प्राणांतिक जखमी झाले. १० जानेवारी १९१५ रोजी त्यांनी प्राण
सोडले.
- डॉ. सुरुची पांडे |
असामान्य - सचीदेवी व विष्णुप्रिया सचीदेवी व विष्णुप्रिया - श्री चैतन्य प्रभूंच्या जीवनातील दोन असामान्य स्त्रिया.
पहिली माता, दुसरी पत्नी. बंगालच्या नदिआ गावच्या प्रतिष्ठित नीलांबर चक्रवर्तीची
कन्या सची. पुरंदर मिश्रा या चारित्र्यवान तरुणाची पत्नी. सचीच्या जीवनग्रंथात
आनंद हा शब्दच नव्हता. आठ गोड मुली एका पाठोपाठ गेल्या. दुःखी सचीने मनःशांतीसाठी
द्वैत आचार्यांची दीक्षा घेतली. कालांतराने दोन पुत्र झाले; पण तरुण विश्वरूप
संन्यास घेऊन निर्मोहीपणे निघून गेला. धक्क्याने पुरंदर गेला. अश्रू आवरून सचीने
विश्वंभरास नेटाने वाढवला. उमदा, उत्साहाने सळसळता विश्वंभर सर्वांच्या गळ्यातला
ताईत बनला. सुलक्षणी लक्ष्मी पत्नी लाभली. सुख डोकावले तोच लक्ष्मी अचानक मृत्यू
पावली. विश्वंभर अंतर्मुख झाला. सचीने त्याचा विवाह पंडित सनातनच्या सालस
सुगृहिणी विष्णुप्रियेसमवेत केला. पण विश्वंभर त्यात रमला नाही. त्याला ईश्वराची
ओढ लागली. संसार की पारमार्थिक जीवन, मनात कल्लोळ उठला. सचीस पुढ्यात उभे असलेले
सत्य उमगले. विश्वंभरास काहीही रोखू शकणार नाही, त्याला संसारातून मोकळे केले
पाहिजे. त्यांनी खंबीर निर्णय घेतला. विश्वंभरास संमती दिली संन्यास घ्यायला.
त्याचा त्याग सामान्य नव्हता. जो यश, लौकिक, समृद्धी घेऊन येणार त्याच लेकाला भगवी
वस्त्रे द्यावी लागली. विश्वंभर "चैतन्य' बनून मार्गस्थ झाला. मागे असहाय माता,
पत्नी ठेवून.
सची व विष्णुप्रिया सावरल्या एकमेकींच्या आधाराने. पतीस संसारात बांधून ठेवू शकलो
नाही, हे शल्य उरी घेऊन विष्णुप्रिया संन्यासिनीचे जीवन जगत राहिली. दिवसभरात
जेवढे वेळा पती व परमेश्वराचे नाव तोंडून येईल, मोजून तेवढ्याच तांदळाचा भात
शिजवून खाई. वृद्ध सासूची सेवा करी. तरुण सुनेकडे पाहून सचीचे डोळे भरून येत.
वैष्णव धर्माची पताका घेऊन देशभर फिरणाऱ्या चैतन्यांच्या कीर्तीने दोघी सुखावत.
हेही सुख अल्पजीवी ठरले. अठ्ठेचाळिसाव्या वर्षी चैतन्यांचे महानिर्वाण झाले.
दुर्दैवाचे तडाखे बसूनही सची व विष्णुप्रिया उन्मळून पडल्या नाहीत. धैर्याने जगत
राहिल्या. ही असामान्य शक्ती त्यांना मिळाली ती त्यांनी केलेल्या वैष्णव धर्माच्या
उपासनेने.
- शुभांगी पाथरकर |
बोधकथा - हारपटू स्वप्निलच्या घरी बरीच लगबग सुरू होती. त्याचे दोन्ही आजी-आजोबा, दोन काका, आत्या,
मामा-मावशी व त्यांचे सर्व कुटुंबीय असे मिळून एकूण ३२ जणांचा मुक्काम त्याच्याकडे
होता. येत्या रविवारी या सर्वांच्या उपस्थित मोठ्या आजोबांच्या हातून त्याचा
सत्कार करण्याचा कार्यक्रम ठरला होता. घराजवळच्या मैदानात होणाऱ्या या
कार्यक्रमाला त्याचे वर्गातील, खेळातील मित्रमैत्रिणीही आपल्या आई-बाबांसोबत येणार
होते. या आगळ्यावेगळ्या सत्काराला त्याच्या बाबांच्या संपादक मित्रांनी काही
पत्रकार व वाहिन्यांच्या प्रतिनिधींनाही बोलावले होते. रविवारी सायं. ५ पासून
कार्यक्रम सुरू झाला, स्वप्निलचे आई-बाबा, काही मित्रमैत्रिणी यांची त्याचे कौतुक
करणारी भाषणे झाली. अखेर ७ वाजता सत्काराचा क्षण आला. आजोबांनी त्याची पाठ थोपटली
व एक स्मृतिचिन्ह दिले. या स्मृतिचिन्हात दोन स्तंभ होते, त्यातील छोट्या स्तंभावर
"स्वप्निल' लिहिले होते. आजोबांनी खुलासा केला, ""शाळेची परीक्षा असो की खेळांच्या
स्पर्धा, स्वप्निल नेहमीच दुसरा आला आहे. पहिला क्रमांक न मिळाल्यामुळे तो कधीही
रडला नाही, निराश दिसला नाही. पहिला येणाऱ्याचे कौतुक व अभिनंदन करण्यात मात्र तो
नेहमी पहिला असतो. मागील महिन्यात तो शंभराव्या वेळी "दुसरा' आला या यशाबद्दल हा
सत्कार आहे.''
तात्पर्य - कोणी "दुसरा' असेल, तरच कोणी "पहिला' येऊ शकेल.
- प्रा. अनिल गोरे |
ग्रहगोलांचे विश्व पृथ्वीवरचे जीवनचक्र सुरळीत चालविणारा सूर्य अधूनमधून त्याचे लहरी व रौद्र स्वरूप
दाखवून आपल्याला घाबरवतो. अचानक सूर्यावर खळबळ दिसू लागते. सूर्याच्या
पृष्ठभागाकडचे तप्त वायू ६००० अंश सेंटिग्रेड तापमानाने खदखदत असतात. अत्यंत
प्रभावी अशा चुंबकीय रेषांनी सूर्याच्या पृष्ठभागावर छोट्या-मोठ्या कमानी उभारल्या
असतात. या कमानीद्वारे सूर्यावरील तप्त वायू इकडून तिकडे जात असतात. अचानक काही
तरी घडते आणि एखादी मोठी चुंबकीय रेषा मध्येच तुटते व त्यावरून जाणाऱ्या तप्त
वायूंचा लोळ तुटलेल्या स्प्रिंगप्रमाणे वळवळत आकाशात प्रचंड ज्वालेसारखा फेकला
जातो. क्षणार्धात कोट्यवधी टन अणुबॉंबच्या स्फोटाएवढी ऊर्जा आकाशात फेकली जाते.
सेकंदाला ४०० ते ७०० कि.मी. वेगाने ही ऊर्जा व विद्युतभारीत कणांचा ढग अंतराळात
प्रवास करू लागतो.
या कणांच्या मार्गात पृथ्वी आल्यास पृथ्वीच्या वातावरणात या विद्युतभारीत कणांचा
वर्षाव होऊ शकतो. पृथ्वीभोवतालचे चुंबकीय क्षेत्र या विद्युतभारीत कणांना काही
प्रमाणात अडवते. मात्र काही कण पृथ्वीच्या वातावरणात घुसून "चुंबकीय वादळ' निर्माण
करतात. या वादळामुळे रेडिओ संदेशवहनात बिघाड होतो. उपग्रहाच्या दळणवळणावर परिणाम
होतो. अनेक उपग्रहांच्या कक्षा पृथ्वीचे वातावरण फुगल्यामुळे बदलतात. यामुळे
सेलफोन, टेलिफोन व उपग्रहांमार्फत येणाऱ्या टीव्हीच्या प्रक्षेपणात बिघाड होऊ
शकतो, तसेच विद्युतप्रवाह नेणाऱ्या तारांमध्ये व विद्युत ट्रान्स्फॉर्मरमध्ये
बिघाड होऊ शकतो. या सर्व संकटांना तोंड देण्यासाठी सौरवादळाची पूर्वसूचना मिळणे
आवश्यक ठरते, यासाठीच शास्त्रज्ञ सूर्यावर नजर ठेवीत आहेत.
- डॉ. प्रकाश तुपे |
सुविचार - अज्ञानासारखा मोठा शत्रू नाही.
|
|
|  |
|